महायुती बहुमताने सत्तेत आल्यानंतर आता महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे दिल्या जाणार? राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत. दुसरीकडे निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या आघाडीत एकदम शांतता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन निकालावरील मौन सोडलं. यावेळी त्यांना महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून अंतर्गत कुरबुरी सुरू असून त्यांच्यात संघर्ष होईल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
advertisement
त्यावर बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या खास स्टाईलने उत्तर दिले. एकट्या भारतीय जनता पक्षाच्या १३३ जागा निवडून आल्या आहेत. त्यांना एवढे बहुमत मिळाले आहे की त्यांच्या कुणी नादी लागेल, असे मला वाटत नाही, असे हसत हसत पवार मिश्किलपणे म्हणाले. एकप्रकारे १३३ जागा आलेल्या भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असेच त्यांनी सुचवले. मुख्यमंत्रिपदाची मागणी करणारे भाजपचे सहयोगी पक्ष शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना सबुरीने घेण्याचा अप्रत्यक्षन सल्ला पवार यांनी दिला.
मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे यांची गुगली
महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? भाजपकडून मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला जातोय, असे विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असे काहीही आमचे समीकरण ठरलेले नाही. मुख्यमंत्रिपदावर आमचे निवडणुकीआधी काहीही ठरले नव्हते, असे सांगत शिंदे यांनी एकप्रकारे गुगली टाकल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमधल्या मुख्यमंत्रिपदावरून अंतर्गत युद्धाला सुरुवात झाल्याचे बोलले जाते.
