महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २४ तास उलटले तरी शरद पवार यांनी कोणतेही भाष्य केलेले नव्हते. त्यामुळे शरद पवार हे निवडणूक पराभवाचे विश्लेषण काय करतात, याकडे राज्याचे लक्ष लागलेले होते. पवार रविवारी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमध्ये आले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेने दिलेला कौल स्वीकारला असून पुन्हा महाराष्ट्रात जाऊन कर्तृत्ववान तरुणांची पिढी उभा करेन, असा मनोदय बोलून दाखवला.
advertisement
बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याने ध्रुवीकरण झाले का?
मनोज जरांगे यांच्या भूमिकांनी ओबीसी एकवटले आणि ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा भाजपला झाला, याबद्दल विचारले असता, यासंबंधीची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. पण असे लोक बोलले आहेत, असे पवार म्हणाले. तसेच बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याने ध्रुवीकरण झाले का असे विचारले असता निश्चित ध्रुवीकरण झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तेच करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते.
समाजाच्या काही घटकांनी मतादानामध्ये वेगळा दृष्टीकोन घ्यावा असे प्रयत्न झाले
इंडिया आघाडी सामूहिक निवडणूक लढविताना कमी पडली का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले, आमच्या सहकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कष्ट खूप घेतले. नेत्यांनी पण कष्ट घेतले. पण तरीही निकाल हवा तसा लागला नाही. लाडकी बहीण योजना आणि काही लोकांनी धार्मिक अँगल देण्याचा प्रयत्न केला, त्याचा निकालावर परिणाम झाला. समाजाच्या काही घटकांनी मतादानामध्ये वेगळा दृष्टीकोन घ्यावा, यासाठी काहींनी प्रयत्न केल्याचे काही लोक सांगतात, आम्ही हे तपासून पाहू, असे शरद पवार म्हणाले.
