नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठी राजकीय हालचाल झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार राहिलेले उदय सांगळे आणि सुनिता चारोस्कर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील या दोन्ही नेत्यांवर पक्षविरोधी भूमिका आणि दलबदलू वृत्तीचा ठपका ठेवण्यात आला आहे.
विधानसभेत उमेदवारी, आता पक्षातून डच्चू...
सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उदय सांगळे, तर दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुनिता चारोस्कर यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, अलीकडे दोघांनीही पक्षाविरोधी कार्य केले तसेच स्वार्थी आणि दलबदलू मानसिकतेची भूमिका घेतल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
advertisement
शरद पवार गटाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, “दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केला असून, पक्षविरोधी कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे.” या निर्णयावर पक्षाच्या जिल्हा आणि प्रदेश नेतृत्वानेही शिक्कामोर्तब केले आहे.
नव्याने रणनीती...
दरम्यान, उदय सांगळे आणि सुनिता चारोस्कर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, त्या चर्चेला आधीच शरद पवार गटाने पुढाकार घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीत नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार गटामध्ये आईटगोईंग झाल्याने आता नव्याने रणनीती आखण्यात येत आहे.
