दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बारामती येथील सहयोग सोसायटीतील पवार कुटुंबीयांच्या निवासस्थानी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दादांवर प्रेम करणारे नागरिक येत आहेत. बुधवारीही दादाप्रेमी नागरिकांनी सहयोगवर गर्दी केली होती. शरद पवार यांनीही 'सहयोग' येथे आलेल्या नागरिकांची भेट घेतली. तसेच पवार कुटुंबाशी देखील चर्चा केली. यावेळी सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, श्रीनिवास पवार, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते.
advertisement
विलिनीकरणावर आज तोडगा निघणार?
शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबातल्या सदस्यांची आज चर्चा होणे अपेक्षित आहे. विलिनीकरणावरून सुरू असलेले दावे प्रतिदावे लक्षात घेता कुटुंबातील सदस्य एकत्र बसून यावर चर्चा करू शकतात, असे कळते. आज सकाळी पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केली होती. या भेटीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर शरद पवार यांनी सहयोगला येतो, असा निरोप दिल्याचेही विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे त्यांना पहिल्यांदाच भेटत आहेत. त्यामुळे शपथविधी आणि त्याआधीच्या-नंतरच्या प्रसंगांवरही चर्चा होऊ शकते.
विलिनीकरणाबाबत पवार आजही आग्रही
अजित पवार आणि आमच्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली होती, हे मुख्यमंत्री फडणवीस यांना काय माहिती? तसेच विलिनीकरणाच्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी माझे नाव घेतले. माझे नाव घेण्याचा त्यांचा संबंध काय? अशा शब्दात पवार यांनी फडणवीसांवर पलटवार केला.
दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या.
