दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. सुरुवातीपासून जरांगे यांच्या आंदोलनाला पवारांचं पाठबळ असल्याचं देखील सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातंय. सत्ताधाऱ्याच्या या आरोपांना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शर पवारसाहेबांचा हात असेल, तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं, असं ओपन चॅलेंज प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलं आहे.
advertisement
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याच्या आरोपांबाबत विचारलं असता शशिकांत शिंदे म्हणाले, सरकारकडे डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असेल, तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं. पवारसाहेब बोलले नाहीत तर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असं सत्ताधारी नेते म्हणत असतात. शरद पवार आंदोलनाबाबत काही बोलले, तर त्यांचा आंदोलनामागे अदृश्य हात आहे, असा आरोप करतात.
त्यामुळे मराठा आंदोलनामागे नेमका कुणाचा हात आहे? की मराठे स्वयंस्फूर्तीने आलेत, की जरांगे पाटील स्वयंस्फूर्तीने आलेत, ते सरकारने बघावं. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून राजकारण करणं बंद करावं. माझी सरकारला विनंती आहे की, कोणाची काय भूमिका आहे, हे न बघता, सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे. आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच या-त्या समितीच्या अहवालाची वाट न बघता सरकारच्या समितीने बैठक घेऊन तत्काळ निर्णय घ्यावे, अशी माझी मागणी आहे, असंही शशिकांत शिंदे म्हणाले.