अपहरण आणि सुटका
टिपी प्रसाद राजू आणि जलंदर पोडाल असं अपहरण झालेल्या दोन भाविकांची नावं आहेत. दोघंही मुळचे ओडीसा राज्यातील रहिवासी असून ते महाराष्ट्रातील शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. शिर्डीला देव दर्शनासाठी जात असताना मालेगाव भागात त्यांचं अपहरण करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी या दोघांना मालेगावजवळील कौळाने येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवलं होतं.
advertisement
पोलीस सूत्रांकडून घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने सूत्रे हलवली. पोलिसांनी कौळाने येथील हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांच्या या कारवाईमुळे अपहरणकर्त्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. पोलिसांनी हॉटेलमध्ये डांबून ठेवलेल्या टिपी प्रसाद राजू आणि जलंदर पोडाल या दोन्ही भाविकांची सुखरूप सुटका केली.
पाच आरोपी जेरबंद
अपहरण आणि डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. समाधान देवरे, रोशन अहिरे, सोमनाथ आहेर, गणेश मेंढावत आणि शिवम पैठणकर असं अपहरणकर्त्या आरोपींची नावं आहेत.
पोलिसांनी या पाचही आरोपींविरुद्ध अपहरण आणि डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिर्डीला दर्शनासाठी आलेल्या या दोघांचे अपहरण आरोपींनी नेमके कोणत्या कारणासाठी केले, यामागे खंडणीचा उद्देश होता की आणखी काही, याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत.