शिर्डी : शिर्डीच्या रस्त्यावर पुन्हा एकदा धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत. दोन मित्रांमधील शाब्दिक वादाचे रुपांतर जीवघेण्या हल्ल्यात झालं आहे. दोन्ही मित्रांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार केले आहेत, या हल्ल्यात दोन्ही मित्र जखमी झाले आहेत. शिर्डीमधील गणेशवाडी परिसरात ही घटना घडली आहे.
साई त्रिभुवन आणि आशिष जाधव अशी जखमी झालेल्या दोघांची नावं आहेत. दोघांवरही साई संस्थानच्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान शिर्डी पोलीस दोघांचेही जबाब नोंदवण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. किरकोळ वादाचं रुपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याने शिर्डीमध्ये खळबळ माजली आहे. मागच्या काही काळात शिर्डीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे, या गुन्हेगारांना आळा घालण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
advertisement
महिन्याभरापूर्वीच शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. शिर्डीमध्ये साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन लोकांवर हा हल्ला करण्यात आला. तिघंही पहाटेच्या सुमारास कामावर जात होते, यावेळी दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.
सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ असं हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत. दोघंही साई संस्थानचे कर्मचारी होते. सुभाष घोडे यांच्यावर कर्डोबा नगर चौकात हल्ला करण्यात आला, तर नितीन शेजुळ यांच्यावर साकुरी शिव परिसरात हल्ला झाला. या भीषण हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. शिर्डीमधील या दुहेरी हत्याकांडानंतरही परिसरात हल्ल्यांच्या छोट्या मोठ्या घटना घडत आहेत, त्यामुळे शिर्डीच्या कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.