पुणे : शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील सहावीत शिकणाऱ्या साईराज मांजरे या 12 वर्षीय विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. साईराजचा मृतदेह त्याच्याच घराजवळील विहिरीपाशी अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाचा छडा लावत असताना शिक्रापूर पोलिसांनी भावकीतीलच एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून या भीषण कृत्यामागील धक्कादायक कारण आता समोर येत आहे.
advertisement
प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या संशयित तरुणाने साईराजवर समलिंगी संबंधासाठी दबाव टाकला असावा आणि त्याला विरोध केल्यानेच त्याचा गळा दाबून किंवा अन्य मार्गाने खून करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. चिमुरड्याचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला त्यावरून या घटनेत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेमुळे दहिवडी गावातील नागरिक रस्त्यावर उतरले असून, अशा नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी करत आहेत.
पावणे दोन वर्षात दुसरा खून
दहिवडी गावात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी साईराजचा मृतदेह आढळला, त्याच परिसरात सुमारे पाऊण दोन वर्षांपूर्वी एका लहान मुलाचा खून झाला होता. त्या खुनाचा तपास अजूनही पूर्ण झालेला नसतानाच आता पुन्हा एकदा तशाच स्वरूपाची घटना घडल्याने पोलीस प्रशासन हादरले आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाचा त्या जुन्या खून प्रकरणाशी काही संबंध आहे का, या दिशेनेही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. आम्ही संशयिताला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
