ठाकरे बंधू एकत्र आले, तर मुंबई महानगर पालिकेसह अनेक ठिकाणी त्यांची ताकद दिसून येईल, अशा चर्चा आहेत. त्या अनुषंगाने दोन्ही बाजुच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जातायत. युती होणार याबाबत उद्धव ठाकरे यांनी अनेकदा संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली होती.
advertisement
या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित होते, तर शाखाप्रमुखांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील युतीबाबत मोठं विधान केलं आहे, चर्चा सुरू आहे, मनसेबाबत युतीचा निर्णय लवकरच घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आमची महत्त्वाची बैठक होत आहे, सध्या पितृपक्ष सुरू आहे, तो संपताच मोठे गौप्यस्फोट आणि धक्के हे दिलेच जातील, असा दावा शितल म्हात्रे यांनी केला आहे. म्हात्रे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्या पुढे म्हणाल्या की, राज ठाकरे युतीबाबत एक चक्कार शब्द देखील काढत नाहीत, मात्र उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याने त्यातून ही वक्तव्य होत आहेत. दिघे साहेबांबाबत राऊत जे काही बोलत आहेत, त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं गांभीर्याने पाहत नाहीत. ज्यांनी कफन आणि खिचडीतून पैसे खाल्ले त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही यावेळी म्हात्रे यांनी लगावला आहे.