अंबरनाथ नगरपरिषदेत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या नगरपरिषेदत शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी झाली. एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न या घोषणाबाजीतून करण्यात आला आहे. या नगरपरिषदेच्या उपनराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि अजित पवाराच्या राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार सदाशिव पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेत घोषणाबाजी केली. भाजपच्या एका महिला कार्यकर्तीनं तर आपल्या पायातली चप्पल काढून हातात घेतली आणि ती दाखवण्याचा प्रयत्न केला. भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्यालयात येऊन ही घोषणाबाजी केल्याने एकच गोंधळ उडाला. या गोंधळसाठी अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनराध्यक्षपदाची निवडणूक कारणीभूत ठरली आहे.
advertisement
उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर पाटलांची निवड झाली आहे. या नगरपरिषदेत अवघे चार नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला उपनराध्यक्षपद मिळालं आहे. उपनराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे 27, राष्ट्रवादीचे चार तर एक अपक्ष असं 32 राजकीय बळ सदाशिव पाटलांना मिळालंय. या नगरपरिषदेत भाजपचा नगराध्यक्ष आहे. तर विरोधी बाकावर भाजपचे 14, काँग्रेसचे 12 आणि एक अपक्ष असं संख्याबळ आहे..
अंबरनाथमध्ये मोठी राजकीय घडामोडी घडल्या
या निवडणुकीपू्र्वी अंबरनाथमध्ये मोठी राजकीय घडामोडी घडल्या. शिंदेंच्या शिवसेनेचे 27 नगरसेवक आहेत. तर भाजपचे 14,अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक आहेत.तर दोन अपक्ष असं संख्याबळ आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपानं बाजी मारली. यानंतर सत्तास्थापनेसाठी भाजपनं शिवसेनेची साथ न घेता थेट काँग्रेसला हात दिला. मात्र भाजप आणि काँग्रेसच्या युतीवरून विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडल्यामुळं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही युती तोंडण्याचे निर्देश दिले.
12 नगरसेवकांना काँग्रेसनं निलंबित केलं
याचवेळी भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या 12 नगरसेवकांना काँग्रेसनं निलंबित केलं आहे. यानंतर भाजपनं काँग्रेसच्या सर्व निलंबित नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून घेत संख्याबळ वाढवत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी केली. मात्र यानंतर श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी मोठी राजकीय खेळी करत थेट अंबरनाथ राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांच्या गटाला गळाला लावलं आणि भाजपला धक्का दिला. शिवसेनेच्या मदतीनं राष्ट्रवादी काँग्रेसला उपनगराध्यक्षपद मिळालंय तर भाजप विरोधी बाकावर बसला आहे.
राजकारणाचे भविष्यातही पडसाद उमटण्याची शक्यता
अंबरनाथची ही निवडणूक श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का देत भाजपच्या सत्तेत येण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. अंबरनाथ नगरपालिकेत रंगलेल्या या राजकारणाचे भविष्यातही पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
