श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते. मुख्य मंदिराचा गाभारा हा अत्यंत छोटा असल्याने मंदिरात मुख्य शिवलिंगावर अभिषेक सुरू असेल, अथवा काही भाविक अभिषेक करण्यास बसले असतील तर दर्शन घेणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी अत्यंत कमी जागा शिल्लक राहते. त्यामुळे तासंतास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना धक्के सहन दर्शन घ्यावे लागते. भीमाशंकर मंदिरात अभिषेक सुरू असताना हा प्रकार नेहमी पहायला मिळतो.
advertisement
नेमकं काय घडलं?
शिवसेना जिल्हा प्रमुख देविदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली त्या वेळेसही भीमाशंकर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भाविकांचा सुरू असलेला अभिषेक संपत आला होता. अभिषेक करताना होणारी आरती सुरू होती. अभिषेक सुरू असताच दरेकर व त्यांचे सहकारी दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले. अभिषेक करणाऱ्या भाविकांच्या मागे उभे राहिले. मंदिर गाभाऱ्यात गर्दी होत असल्याने त्यावेळी मंदिरात पुजारी असणाऱ्या योगेश शिर्के यांनी दरेकर यांना दर्शन घेऊन बाहेर जाण्याची विनंती केली. तर दरेकर यांनीही शिवलिंगाची पूजा करण्याची व शिवलिंगावर पाणी घालण्याची इच्छा व्यक्त केली.
याच बाबीवरून दरेकर व पुजारी योगेश शिर्के यांच्यात बाचाबाची झाली. त्यात मंदिर गाभाऱ्यातच दरेकर यांनी पुजाऱ्याला शिवीगाळ केली. मंदिर गाभाऱ्यातून बाहेर पडल्यानंतर देविदास दरेकर यांनी पुजारी योगेश शिर्के यांना मारहाण केली. यावेळी इतर पुजाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाढ मिटवला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
भ्रष्टाचार बाहेर काढणार...
मारहाण झालेल्या पुजाऱ्याने कोणत्याही प्रकारची तक्रार दिलेली नाही. तर झालेल्या मारहाणीच्या घटनेवर लवकरच पत्रकार परिषद घेऊन भीमाशंकर मंदिरातील पुजाऱ्यांची वाढती आरेरावी व मंदिर परिसरात दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार जनतेसमोर आणणार असल्याचे पुजाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना जिल्हा प्रमुख देविदास दरेकर यांनी सांगितलंय.
