बुलढाण्यातील खामगावमधील हा प्रकार असल्याचे समजते. शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखांमध्ये कामाच्या कमिशन वरून तुफान शिवीगाळ झाली आहे. शिवीगाळीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप खामगावचे शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांची असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे निकटवर्तीय असलेले बघे यांची क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
शासकीय कामात कमिशन वरून फोनवर हा वाद झाला. या वादात कमिशनवरून एकमेकांना हमरीतुमरी करत अश्लील शिवीगाळ करण्यात आली. शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांच्यामुळे शिवसेनेतील सत्य बाहेर आले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी हे कामांमध्ये आपले कमिशन खात असल्याचे ऑडिओ क्लिपवरून स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वादात मात्र, जिल्ह्यातील शिंदे गटाच्या नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्याच्या परिणामी एकंदरीत चर्चांना उधाण आले आहे.
तालुक्यातील एका कामाचे पाच लाख रुपये मिळाले. या कामातील कमिशन मागण्यात आले. त्यावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा राजकीय इतिहास काढत, कोण किती निष्ठावान आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांचाही पारा चढला आणि एकमेकांना शिवीगाळ सुरू झाली.
(न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही)
