आगामी मुंबईसह ठाणे आणि इतर महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मुंबईतील काही जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा होती.
वरळी येथील हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी जागा वाटपाची घोषणा केली. नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे आदी महापालिकांमधील जागा वाटपांबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे समोर आले आहे.
advertisement
युतीची घोषणा...
ठाकरे गट आणि मनसे यांची मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, मीरा-भाईंदर, छत्रपती संभाजीनगर आदी महापालिकांमध्ये युतीच्या माध्यमातून लढणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेना आणि मनसे ही निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे.
जागा वाटप जाहीर का नाही?
राज ठाकरे यांनी केलेल्या दोन वक्तव्यांमध्ये जागा वाटप जाहीर न करण्यामागील कारण असल्याचे जाणकार सांगतात. ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. जागा वाटप जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जागा वाटप जाहीर करण्यात आले नसल्याचे म्हटले जात आहे. तर, ठाकरे गट आणि मनसेमध्ये अजूनही एक-दोन जागांवर तिढा राहिला असल्याचीही शक्यता आहे. मात्र, राज यांनी जागा वाटप पूर्ण झाल्यानंतरच युतीची घोषणा करावी अशी भूमिका घेतल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे ज्याअर्थी युतीची घोषणा झाली, त्या अर्थी जागा वाटप पूर्ण झाले असल्याचा अंदाज आहे.
ठाकरेंसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटही येण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या जागा वाटपानंतर आम्ही जागा वाटपाबाबतचा प्रस्ताव देऊ अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. त्यामुळे आता राज-उद्धव यांच्या जागा वाटपानंतर राष्ट्रवादीला काही जागा सोडण्यात येतील असा अंदाज आहे. त्यामुळेच आज जागा जाहीर करण्यात आल्या नाहीत अशी चर्चा सुरू आहे.
जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतरच युतीची घोषणा...
उद्धव आणि राज ठाकरे हे कुटुंब म्हणून पुन्हा एकत्र आले होते. त्याशिवाय राजकीय मंचावरही एकत्र दिसले आहेत. मात्र, ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबतच्या घोषणेसाठी वेळ घेण्यात आला. जागा वाटपांचा तिढा सुटल्याशिवाय युतीची घोषणा नाही, अशी भूमिका मनसेने घेतली होती. युतीची घोषणा झाल्यास आणि जागा वाटपावरुन बिनसल्यास मनसेला त्याचा फटका बसण्याची भीती देखील व्यक्त केली जात होती. त्यामुळेच जागा वाटपाआधीच युतीची घोषणा टाळली जात असल्याचे म्हटले जात होते. अखेर आता, युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
