शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होती. जागा वाटपाचा तिढा सोडवल्यानंतर युतीची घोषणा करण्यात आली. शिवसेना भवन असलेल्या दादर-माहीम भागातील जागा वाटपाच्या मुद्यावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती होती. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे आणि शिवसेना (एकसंध) या दोन्ही पक्षांचे आमदार निवडून गेले आहेत. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने विजय मिळवला.
advertisement
>> बालेकिल्ल्यातील इच्छुकांनी डोकेदुखी वाढणार?
ठाकरे गट आणि मनसेच्या जागा वाटपाच्या चर्चेत दादर-माहीमच्या जागा कळीच्या ठरल्या. शिवसेना भवन, राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले 'शिवतीर्थ' अशी महत्त्वाची ठिकाणे याच भागात येतात. जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेला ४ जागा आल्या असून दोन जागांवर मनसेचे उमेदवार असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसेच्या वाटेला १९० आणि १९२ हे दोन मतदारसंघ सुटले आहेत. मात्र, त्यावरून आता ठाकरे बंधूंची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिका वॉर्ड क्रमांक १९२ आणि १९४ तिढा सोडवितांना वॉर्ड क्रमांक १९२ हा मनसे पक्षाकडे आणि १९४ वॉर्ड हा ठाकरेंच्या शिवसेनेला युतीमध्ये सोडण्यात आला. मात्र, वॉर्ड क्रमांक १९२ आपल्याला मिळावा यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सायंकाळी चार वाजता भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे. या वॉर्डमधून माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हे शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला येणार आहेत. याच ठिकाणाहून मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार हे उमेदवार असणार असल्याची माहिती आहे.
> मनसेच्या दुसर्या प्रभागावरही दावा?
जागा वाटपाच्या चर्चेत माहीम विधानसभेतील १९० हा वॉर्डही मनसेसाठी सोडण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणाहून ठाकरे गटाचे राजू पाटणकर हे स्वत:साठी अथवा पत्नीसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. २०१७ मधील निवडणुकीत या वॉर्डमधून भाजप उमेदवार शीतल गंभीर या ४४३ मतांनी विजयी झाल्या होत्या. तर, शिवसेनेच्या वैशाली राजेश पाटणकर या दुसऱ्या स्थानी होत्या. मागील काही निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसैनिकांना या वॉर्डमधून विजयाचा गुलाल उधळता आला नाही. त्यातच आता मनसेसाठी सोडण्यात आलेल्या जागेवर ठाकरेंच्या शिलेदाराने दावा सांगितल्याने ही जागा कळीची ठरण्याची शक्यता आहे. या ठिकाणाहून मनसेचे माजी नगरसेवक मनिष चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
> मिलिंद वैद्य यांच्या उमेदवारीला विरोध?
भाजप-शिंदे गटाच्या महायुतीचे तगडं आव्हान ठाकरे बंधूंसमोर असणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे ठाकरेंकडून काही ठिकाणी आपल्या जुन्या शिलेदारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. माजी महापौर मिलिंद वैद्य यांना वॉर्ड १८२ मधून पु्न्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला ठाकरे गटातूनच आव्हान दिले जात असल्याचे म्हटले जात आहे. या ठिकाणाहून इतरही काही उमेदवार इच्छुक असून अभय तामोरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. मिलिंद वैद्य यांची या वॉर्डवर असलेली पकड आणि विजयाची संधी पाहता पुन्हा त्यांना संधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, इच्छुकांच्या आग्रहामुळे 'मातोश्री'ची डोकेदुखी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.
