मुंबई: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू झाली आहे. मागील काही महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा बुधवारी होणार आहे. मागील काही दिवसांपासून मराठीबहुल भागामध्ये मनसे आणि ठाकरे गटात जागा वाटपाचा तिढा सुरू होता. अखेर या जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
शिवसेना भवन असलेल्या दादर-माहीम भागातील जागा वाटपाच्या मुद्यावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती होती. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे आणि शिवसेना (एकसंध) या दोन्ही पक्षांचे आमदार निवडून गेले आहेत. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने विजय मिळवला. मनसेला तिसऱ्या क्रमांकाची मते असली तरी त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती.
> 'शिवतीर्था'च्या अंगणात कोणाचा उमेदवार?
दादर-माहीम या भागात शिवसेना आणि मनसे यांची तुल्यबळ ताकद आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेच्या जागा वाटपाच्या चर्चेत दादर-माहीमच्या जागा कळीच्या ठरल्या. शिवसेना भवन, राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले शिवतीर्थ अशी महत्त्वाची ठिकाणे याच भागात येतात. मराठीपण टिकवून ठेवलेल्या या भागात अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूने दावे करण्यात आले होते.
> जागा वाटपाचं गणित सुटलं?
मागील २०१७ मधील महापालिकेच्या निवडणुकीत दादर माहीम भागात एकसंध शिवसेनेने आपलं वर्चस्व दाखवलं होतं. चार जागा शिवसेनेने जिंकल्या. तर, मनसे आणि भाजपने एका जागेवर विजय मिळवला होता. भाजपनेही अगदी कमी मताधिक्याने एका जागेवर विजय मिळवला होता. मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, प्रीती पाटणकर, समाधान सरवणकर हे चारजण एकसंध शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तर मनसेकडून हर्षला मोरे आणि भाजपकडून शीतल गंभीर विजयी झाल्या होत्या.
मनसे आणि ठाकरे गटाकडून दोन्ही बाजूने अधिकाधिक जोर लावण्यात आला होता. मात्र, या ठिकाणच्या जागांवर तोडगा काढण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेला ४ जागा आल्या असून दोन जागांवर मनसेचे उमेदवार असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसेच्या वाटेला १९० आणि १९२ हे दोन मतदारसंघ सुटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, इतर ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत. प्रभाग १९४ मध्ये ठाकरे गटाकडून नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची मिळू शकते अशी चर्चा आहे.
