शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होऊ नये यासाठी स्वतः पुढाकार घेत मध्यस्थी केल्याचे चित्र सोमवारी मध्यरात्री ‘मातोश्री’वर पाहायला मिळाले. आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद थेट मातोश्रीपर्यंत पोहोचले होते.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म वाटपाच्या प्रक्रियेदरम्यान वरळीतील काही प्रभागांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला. याची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरे यांनी नाराज पदाधिकारी आणि उमेदवारांना मध्यरात्री मातोश्रीवर बोलावून थेट चर्चा केली. उमेदवारी मिळालेल्या तसेच नाराज उमेदवारांसोबत स्वतंत्रपणे संवाद साधत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
advertisement
>> कुठं उफाळून आली होती नाराजी?
प्रभाग क्रमांक १९३ मधून हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्यानंतर शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर कोळी यांची समजूत काढण्यासाठी 'मातोश्री'वर बोलावण्यात आल्याचे समजते. तसेच प्रभाग क्रमांक १९६ मध्ये विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने महिला शाखाप्रमुख संगीता जगताप आणि युवासेना पदाधिकारी आकर्षिका पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.
याशिवाय प्रभाग क्रमांक १९७ मनसेला देण्यात आल्याने शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त करत थेट राजीनाम्याचा इशाराही दिला होता. या सर्व नाराजी नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्रीपर्यंत बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघात अंतर्गत बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी पक्ष नेतृत्वाने वेळीच हस्तक्षेप केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र ही नाराजी कितपत शमते आणि निवडणुकीत याचा परिणाम होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
