आमदार अनिल परब हे मातोश्रीचे विश्वासू समजले जातात. मुंबई महापालिका निवडणूक रणनीतीत त्यांची भूमिक महत्त्वाची ठरली आहे. मुंबईतील वॉर्डनिहाय समीकरणांची बेरीज-वजाबाकीवर त्यांचे लक्ष असल्याचे म्हटले जाते. मात्र, मुंबई महापालिका तिकिट वाटपादरम्यान, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आमदार अॅड. अनिल परब यांनी थेट ठाकरे कुटुंबाशी टोकाची भूमिका घेतल्याचं चित्र आहे. स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विनंती करूनही आपल्या कट्टर समर्थकाने अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास परब यांनी नकार दिल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात परब यांच्या निकटवर्तीयाने बंड कायम ठेवल्याने वांद्रे पूर्वातील राजकीय वातावरण तापलं आहे.
advertisement
बाळा सावंत आणि विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनानंतर वांद्रे पूर्व हा मतदारसंघ ठाकरे गटासाठी आव्हानात्मक ठरला होता. शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात सक्षम चेहरा नसल्याने आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांना मैदानात उतरवण्यात आलं. सरदेसाईंनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वर्चस्वाला आव्हान देत विजय मिळवला. या यशामागे ज्यांनी मेहनत घेतली, त्यांनाच महापालिकेची उमेदवारी मिळावी, असा आग्रह सरदेसाईंनी धरला आणि याच मुद्द्यावरून आमदार अनिल परब यांच्याशी त्यांचे मतभेद उफाळून आल्याचे सांगण्यात येते.
मध्यस्थीचा प्रयत्न अयशस्वी?
हे मतभेद मिटवण्यासाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रभाग क्रमांक ९५ मध्ये हरी शास्त्री यांनाच उमेदवारी देण्यात आली आणि सरदेसाईंचं पारडं जड ठरलं. यामुळे अनिल परब नाराज झाले. तर या प्रभागातील दावेदार चंद्रशेखर वायंगणकरही अस्वस्थ झाले. परब यांच्या पाठबळावरच वायंगणकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
ठाकरेंच्या उमेदवाराविरोधातील उमेदवारा बळ?
आता या अपक्ष उमेदवाराला आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडून आणण्यासाठी अनिल परब थेट मैदानात उतरल्याची चर्चा आहे. ठाकरे कुटुंबाशी असलेले घनिष्ठ संबंध काही काळ बाजूला ठेवत, परब उघडपणे बंडखोर उमेदवाराचा प्रचार करणार का, याचीही चर्चा रंगली आहे. निवडणुकीनंतर या शिलेदाराला पुन्हा ठाकरे गटात सामावून घेण्याची रणनीतीही आखण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितले. याआधीदेखील २०१७ मध्येही काही बंडखोरांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
संयुक्त मेळावा, पडद्यामागे नेमकं काय?
अनिल परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरुण सरदेसाई यांनी त्यांच्या निवासस्थानी जात शुभेच्छा दिल्या. त्यानंतर परब यांनी मातोश्रीवर जात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांनी वांद्रे पूर्वमधील सातही उमेदवारांसाठी मेळावा घेतला होता. त्यावेळी परब यांनी मार्गदर्शन केले होते. मातोश्रीच्या परिसरात सातही उमेदवार शिवसेना-मनसे युतीचे विजयी होणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मातोश्रीच्या अंगणातील निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे म्हटले जात आहे.
