बुधवारी नवी मुंबईतील कोकण भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ६५ नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी प्रक्रिया पार पडली. या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेदरम्यान, मुंबईच्या प्रभाग क्रमांक १५७ मधून 'मशाल' चिन्हावर निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के गैरहजर होत्या. त्याआधी डॉ. सरिता म्हस्के या शिवसेना भवनातील बैठकीतही अनुपस्थित होत्या. म्हस्के यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली होती.
advertisement
डॉ. म्हस्के रेंजमध्ये आल्या... मातोश्रीवर बैठक
डॉ. सरिता म्हस्के यांनी मध्यरात्री ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर म्हस्के यांनी कोकण आयुक्तांकडे आपली नोंदणी केली. त्यानंतर आपल्या नॉट रिचेबल होण्यावर पहिल्यांदाच भाष्य केले.
नॉट रिचेबल होण्यास कोणी सांगितलं? डॉ. म्हस्के यांनी सगळं सांगितलं...
कोकण भवनातील नोंदणीनंतर डॉ.सरिता म्हस्के यांनी नॉट रिचेबल होण्यामागील कारण सांगितलं. त्यांनी म्हटले की, मी देवदर्शनाला पतीसह गेले होते. बुधवारच्या बैठकीबाबत मंगळवारी रात्री उशिरा निरोप मिळाला. तोपर्यंत आम्ही निघालो होतो. आम्ही मिलिंद नार्वेकर यांना माघारी येत असल्याचे कळवले. मात्र, माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यावेळी आम्हाला पक्षाने तात्काळ फोन बंद करण्याचे आदेश दिले होते. आम्हाला ट्रेस केले जाईल, त्यासाठी फोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबईत पक्ष नेत्यांना भेटण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आल्याचे डॉ. सरिता म्हस्के यांनी सांगितले. पक्षाकडून आमची काळजी घेण्यात आली. आमच्या सुरक्षितेसाठी आणि काळजीसाठीच नॉट रिचेबल राहण्याचे आदेश पक्षाने दिल्याचे सांगण्यात आले.
मध्यरात्री मिलिंद नार्वेकराच्या भेटीसाठी दाखल...
डॉ. सरिता म्हस्के या मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. त्यावर म्हस्के यांनी सांगितले की, नार्वेकर यांची तशी सूचना होती. आमच्या पक्षाचे ते नेते आहेत. त्यांनी आमच्या सुरक्षितेसाठी आणि काळजीसाठी काही सूचना केलेल्या, त्याचे पालन आम्ही केले होते, असेही म्हस्के यांनी सांगितले.
