राहुल सोलापूरकर याच्या घरासमोर शिवसैनिकांचा राडा
राहुल सोलापूरकर याने व्यक्त केलेली दिलगिरी शिवप्रेमींच्या पचनी पडली नाही. ही दिलगिरी नसून केवळ दिखावा असल्याचं सांगत राहुल सोलापूरकरने याने नाक रगडून महाराजांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करत पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार आंदोलन केलं.
शिवसेना उबाठाच्या शिवसैनिकांनी निदर्शनं करत राहुल यांच्या घराकडे कूच केली. मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्यानं गनिमी काव्यानं ते राहुल सोलापूरकर याच्या घरावर धडकले. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिथेच ठिय्या मांडला. साधारण तासभर शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली. त्यानंतर मात्र पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढलं. राहुल सोलापूरकर घरात नसल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलकांना पांगवलं.
advertisement
शिवप्रेमींप्रमाणेच खासदार उदयनराजे भोसले यांनीही आक्रमकपणे आपला संताप व्यक्त केलाय. राहुल सोलापूरकर हा कोण आहे? त्याचे विधान ही चूक नाही तर घोडचूक आहे. अशा व्यक्तींच्या जिभा हासडल्या पाहिजेत. समाजात अशाच विकृतांमुळे तेढ निर्माण होते. समाजातील अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. राहुल सोलापूरकर सारख्या प्रवृत्तींना गोळ्या घालून मारलं पाहिजे. शिवरायांनी लाच दिली म्हणणारे सोलापूरकर ही तर औरंजेबाची अवलाद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल सोलापूरकरवर कारवाई करावी. तुरुंगात टाकून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.
छत्रपती शिवरायांवर बोलताना राहुल सोलापूरकर नेमका काय म्हणाला?
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले, त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते आग्र्याहून बाहेर पडले. त्यामुळे इतिहास गोष्टीरुपात आला की रंजकता येते आणि रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो, असे राहुल सोलापूरकर म्हणाले.
