ही घटना ताजी असताना आता शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला मोठं खिंडार पाडलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरमध्ये भाजपच्या दोन माजी जिल्हाध्यक्षांसह आठ माजी नगरसेवकांना शिंदे गटानं आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली असून, महापालिका निवडणुकीत हा भाजपासाठी मोठा आघात ठरू शकतो.
advertisement
खरं तर, महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत. मात्र उल्हासनगरमध्ये आतापासूनच महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तसतसं शहरात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला आहे. त्यामुळे एकमेकांचे माजी नगरसेवक फोडण्याचे राजकारण सुरू झाले आहे. अशात शिवसेना शिंदे गटाने भाजपला खिंडार पाडलं आहे. शिंदेंनी भाजपच्या दोन माजी जिल्हाध्यक्षांसह ८ नगरसेवकांना फोडलं आहे.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक जमनू पुरुसवानी, महेश सुखरामानी, प्रकाश माखीजा आणि चार्ली पारवानी, नगरसेविका मीना सोंडे, विजय पाटील, रवी पाटील आणि किशोर बनवारी यांनी मुंबई येथे शुक्रवारी एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भाजपच्या जिल्हा नेतृत्वासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षांतरामुळे उल्हासनगरच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.
