या व्हिडीओत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी देखील दिसत आहेत. ते बंडल हाताळणाऱ्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधताना दिसत आहेत. याबाबतचे तीन व्हिडीओ अंबादास दानवे यांनी पोस्ट केले आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्यांच दिवशी अंबादास दानवे यांनी अशाप्रकारे कॅश बॉम्ब टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने आजचा अधिवेशनाचा दिवस गाजण्याची शक्यता आहे. या व्हिडीओच्या आधारे विरोधक सरकारला घेरू शकतात.
advertisement
अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प्रश्न विचारला आहे. "या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे.. जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?" असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे.
अंबादास दानवे यांच्या ट्विटवर महेंद्र दळवींची प्रतिक्रिया
अंबादास दानवेंनी तीन व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर व्हिडीओत दिसणारे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अंबादास दानवेंनी याबाबत स्पष्टोक्ती द्यावी, त्यानंतर मी प्रतिक्रिया देईन. असं कुणाला तरी ब्लॅकमेल करणं, उचित नाहीये. आता अंबादासला कुठलं काम उरलं नाही. तो होपलेस माणूस आहे. त्याला कुठलंही ज्ञान नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. असं काही असेल तर त्यांनी ओपन चॅलेंज द्यावं. त्यांनी तो संपूर्ण व्हिडीओ दाखवावा, असं काहीतरी करून कुणाला तरी ब्लॅकमेल करणं त्यांना शोभत नाही. अंबादास दानवेंची लायकी काय आहे, सर्वांना माहीत आहे." अशा शब्दात दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दळवी पुढे म्हणाले की, दानवेंनी संपूर्ण व्हिडीओ दाखवावा, मग लोकांना तरी कळेल. असं ब्लॅकमेल करणं ठीक नाही. माझं ओपन चॅलेंज आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टी घेऊन कोणत्याही चॅनेलवर डिबेटला यावं, माझी तयारी आहे, त्यांनी केवळ माझा फोटो दाखवला आहे. पैसे मोजणारी व्यक्ती कोण आहे, हे त्यांनी दाखवली नाही, त्यांनी ती दाखवावी, ते इतरांना हलक्यात घेतात, आम्हाला घेऊ नये.
