नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख अवघ्या दहा दिवसांवर आलीय. प्रचाराचा जोरदार धडाका राजकीय पक्षांकडून सुरू आहे. दरम्यान, बंडखोरी केलेल्या आणि पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात पक्षांकडून कठोर पावले उचलली जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाने माजी खासदाराला पक्षातून काढून टाकलंय. पक्षविरोधी कृत्य केल्यानं ही कारवाई केली असल्याचं पत्रक जारी करण्यात आलं आहे.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ठाकरे गटाने दिलीय.
सुभाषराव वानखेडे हे तीन वेळा शिवसेनेकडून आमदार होते. तर एकदा ते खासदार म्हणून विजयी झाले होते. २०१४ ला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकीटावर ते २०१९च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून लढले. मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुभाष वानखेडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
शिवसेनेत फुटीनंतर ठाकरे गटात प्रवेश केलेले सुभाष वानखेडे हे हदगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे तिकीटही मागितलं होतं. पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. यामुळे नाराज झालेल्या सुभाष वानखेडे यांनी ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावर गंभीर असे आरोप केले होते. या आरोपांमुळेच सुभाष वानखेडे यांच्यावर कारवाई झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुभाष वानखेडे यांनी बबन थोरात यांच्यावर आरोप करताना म्हटलं होतं की, बबन थोरात हे उमेदवारी विकत देतात. त्यांनी शिवसेना सुद्धा विकली असल्याचा आरोप केला होता.