नांदेड शहरातून शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचं अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. गौरव कोटगिरी असं या शहर प्रमुखांचं नाव आहे. रात्री ९ च्या सुमारास बाफना टी पॉइंटजवळून त्यांचं अपहरण करण्यात आलं. मात्र अपहरणानंतर अवघ्या तासाभरात आरोपींनी त्यांची सुटका केली. अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या आहेत. याबाबतची माहिती स्वत: कोटगिरी यांनी दिली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव कोटगिरी हे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास बाफना टी पॉइंट परिसरात आले होते. इथे ते आपल्या गाडीची दुरुस्ती करत होते. याचवेळी ५ ते ६ जणांनी चाकूचा धाक दाखवत त्यांचं अपहरण केलं. कोटगिरी यांना अशाप्रकारे अज्ञातांनी उचलून नेल्यानंतर चालकानं तातडीनं फोन करून कोटगिरी यांच्या पत्नीला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कोटगिरी यांच्या पत्नीनं चालकासह इतवारा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.
एकीकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना अपहरणानंतर अवघ्या तासाभरात आरोपींनी गौरव कोटगिरी यांना सोडून दिलं. हे अपहरण नेमकं कुणी केलं, याची कसलीही माहिती समोर आली नसली तरी आरोपींनी कोटगिरींचं अपहरण करून त्यांना विविध धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर स्वत: कोटगिरी यांनी ही दिली. राजकीय नेत्यांविरोधात बोलू नका, अन्यथा जीवे मारू, प्रॉपर्टीचे खरेदी विक्री व्यवहार बंद कर, आज फक्त उचललंय, यानंतर जीवे मारू, अशा प्रकारची धमकी दिल्याची माहिती कोटगिरी यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.