विरोधी पक्षांकडून अंबादास दानवे यांचं निलंबन मागे घेण्याची विनंती सभापती निलम गोऱ्हे यांना करण्यात आली. यावर निलम गोऱ्हे यांच्या दालनात बैठक पार पडली. दरम्यान, यावर सत्ताधारी पक्षाने आम्ही आमचा निर्णय सभागृहात जाहीर करू अशी भूमिका मांडण्यात आली. आता अंबादास दानवे यांच्या निलंबनावर सभागृहात ३ वाजता निलम गोऱ्हे निर्णय जाहीर करणार आहेत.
advertisement
अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांना पत्र लिहिलं असून त्यात त्यांनी निलंबनाचा फेरविचार व्हावा असं म्हटलंय. अंबादास दानवे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, सोमवार दिनांक १ जुलै, २०२४ रोजी विधानपरिषद सभागृहात झालेल्या घटनेनंतर मला मंगळवार, दिनांक २ जुलै, २०२४ रोजी आपण ५ दिवसांसाठी निलंबीत केले. मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा व परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. परंतु दिनांक १ जुलै, २०२४ रोजी माझ्याकडून अनावधनाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले.
माझ्या वक्तव्यासंदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे, हे आपण जाणताच आणि माझीही भुमिका सभागृहाचे पावित्र्य कायम राहावे हीच आहे. त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतू परंतू नाही. सभागृहाचे कामकाज सुरु आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता- भगिणींचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणीचे प्रश्न सोडविण्यापासून मला थांबविणे असे होवू नये. या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंती दानवे यांनी केलीय.