बेळगाव: देशभरात थंडीचा कडाका वाढत चालला आहे. थंडीपासून बचावासाठी घर गरम ठेवण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत असतात. पण, बेळगावात थंडीपासून बचावासाठी शेगडी पेटवणे ३ जणांच्या जीवावर बेतलं आहे. घरात शेगडी पेटवून झोपलेल्या ३ तरुणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तर अन्य एका तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावमधील अमननगर भागात ही घटना घडली. थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी रात्री खोलीत शेगडी पेटवून झोपणे बेळगावातील अमन नगरातील तीन तरुणांच्या जीवावर बेतलं आहे. घरात शेगडीच्या धुरामुळे घरात विषारी वायूचा फैलाव झाल्यामुळे या तिघांचाा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. बेळगावातील अमन नगरात मंगळवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.
या तरुणांचे कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते, त्यामुळे रात्री केवळ हे तरुणच घरी परतले होते. थंडी अधिक असल्यानं त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी ऊब घेण्यासाठी शेगडी पेटवली. मात्र, रात्री घराला आतून कडी लावल्यामुळे शेगडीचा धूर बाहेर जाण्यासाठी कोणतीही वाट राहिली नाही. यामुळे खोलीत विषारी धूर पसरला.
कुटुंबीय दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी घरी परतले, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांनी कसाबसा दरवाजा उघडून पाहिले असता घरातील चार तरुणांपैकी तिघांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. तर चौथा तरुण गंभीर अवस्थेत होता. त्यांनी तातडीने याची माहिती पोलीस आणि रुग्णवाहिकेला दिली. जखमी तरुणाला तातडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय
मृतांमध्ये मोईनुद्दीन नालबंद, सरफराज हरपनहळ्ळी आणि रेहान मदले यांचा समावेश आहे. शहानवाज नावाच्या तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी झालेले सर्व तरुण २२ ते २३ वर्षे वयोगटातील आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
