मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या पूर्व भागात असलेल्या केमिकल कंपन्यांनी हवेत वायू सोडल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्रीच्या सुमारास इथल्या रासायनिक कंपन्या वारंवार चोरून वायू हवेत सोडत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास होतो. आज मंगळवारी देखील रात्री 10 च्या सुमारास केमिकल कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात वायू सोडला असावा.
advertisement
त्यामुळे एमआयडीसी परिसरातच्या लगत असलेल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात धुरकट वातावरण निर्माण झालं होतं. दृश्यमानता कमी झाल्याने वाहन चालकांना याचा त्रास होत होता, तर अनेकांना याचा त्रास झाल्याने त्यांनी तोंडाला रुमाल बांधून आपला बचाव केला. सातत्याने या भागात रासायनिक कंपन्यांकडून रासायनिक वायू हवेत सोडला जात असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडे डोळेझाक करतं. त्यामुळे या रासायनिक कंपन्यांचं मनोबल वाढलंय आणि त्यामुळे सातत्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतंय, असा आरोप नागरिक करत आहे.