सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचं एक खास नातं आहे. त्यामुळे अनेकदा बाबासाहेब विविध कारणांनी सोलापूरला आले होते. आजही सोलापुरातील अनेक वस्तू आणि वास्तू बाबासाहेबांच्या इतिहासाची साक्ष देत आहेत. वळंसग येथे अशीच एक विहीर असून बाबासाहेबांनी स्वत: या विहिरीचं उद्घाटन केलं होतं आणि पाणीही प्यायले होते. आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरातील याच ऐतिहासिक विहिरीबाबत ग्रामस्थ सिद्धाराम वाघमारे यांनी माहिती दिलीये.
advertisement
महाराष्ट्रातली इतर ठिकाणांप्रमाणेच विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे सुद्धा दलितांना गावच्या पाणवठ्यावर पाणी भरण्यास मनाई होती. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून वळसंग येथील दलित बांधवांनी श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून विहीर खोदली. 1937 मध्ये दलित वस्तीतील विहिरीचं खोदकाम पूर्ण झालं, असं वाघमारे सांगतात.
गावकऱ्यांचा निर्णय अन् बाबासाहेब गावात
विहिरीचं काम पूर्ण झालं त्याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्ह्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर वळसंगला येऊन आडाच्या पाण्याला स्पर्श करीत नाहीत, तोपर्यंत आडाचे पाणी कोणीही प्यायचे नाही, असा पवित्रा येथील दलित बांधवांनी घेतला होता. अखेर तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते भुजंगप्पा रुई, तेजप्पा वाघमारे, ओंकारी गायकवाड, विजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून 24 एप्रिल 1937 रोजी बाबासाहेब आंबेडकर वळसंग येथे आले.
Ambedkar Jayanti 2025: बाबासाहेबांनी मुक्काम केलेलं गंगा निवास, सोलापुरात आजही जपलाय ऐतिहासिक ठेवा!
बाबासाहेब वळसंग येथे आल्यावर त्यांची गावातून मिरवणूक काढण्याचा निर्णय झाला. त्यानुसार स्वातंत्रसैनिक गुरुसिध्दप्पा अंटद यांनी स्वत:ची बैलगाडी बाबासाहेबांच्या मिरवणुकीसाठी उपलब्ध करून दिली. मिरवणुकीनंतर बाबासाहेब यांनी रेशमी दोरीने पाणी शेंदून चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्राशन केले. तेव्हापासून आजही येथील बांधव याच आडाचे पाणी पिण्यासाठी वापरत आहे.
24 जानेवारी हा दिवस उत्सव म्हणून साजरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वळसंग गावाला 24 जानेवारी 1937 रोजी भेट दिली होती. तेव्हापासून दलित बांधवांकडून 24 जानेवारी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गावात सगळीकडे रांगोळ्या काढल्या जातात. मिठाई वाटप केली जाते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. बाबासाहेबांच्या भेटीचा ऐतिहासिक ठेवा वळसंगकरांनी उत्सवाच्या रुपात आजही जपून ठेवला आहे. तसेच वळसंगची विहीर आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासाची साक्ष देतेय.





