सोलापूर : सोशल मीडियाच्या जमान्यात इन्फ्लुएन्सरला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. सुरुवातीला फक्त मजा म्हणून व्हिडीओ शूट केले होते. आता त्यांना वर्षाला लाखोंची कमाई मिळत आहे. छोट्याशा व्हिडीओतून महिन्याला हजारांची कमाई होत आहे. टेंभुर्णी या गावातील एका औदुंबर गवारे या युट्युबरने यूट्यूबच्या कमाईतून स्वतःचे घर घेतले आहे. तसेच 3 गुंठे जागाही विकत घेतली आहे. नेमकं त्यांनी हे कसं केलं, हेच जाणून घेऊयात.
advertisement
औदुंबर गवारे हे धाराशिव येथील मूळ रहिवासी आहेत. मागील 4 वर्षांपासुन ते सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून टाकत आहे. युट्युबर औदुंबर गवारे यांचे शिक्षण ITI पर्यंत झाले आहे. औदुंबर गवारे हे पुण्यात एका खासगी कंपनीत कामावर होते. पुणे येथील कंपनीतील काम सोडुन ते टेंभुर्णी येथील एमआयडीसी येथे कामाला आले. येथे भाड्याच्या घरात राहत होते.
यासोबतच त्यांनी पाण्याचे जार टाकण्याचे आणि गोळ्या बिस्कीट विकण्याचेही काम केले. दरम्यान, युट्युबर औदुंबर गवारे यांनी पहिला व्हिडीओ टिकटॉक या ॲपवर अपलोड केला होता. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. मग त्यांनी तो व्हिडीओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला.
पोटाच्या आजारांपासून ते केसगळतीपर्यंत, मोसंबी आरोग्याला खूपच फायदेशीर, महत्त्वाची माहिती
दरम्यान, त्यांना एका सोशल मीडियावर ॲप वरून फोन आला की तुम्ही आमच्या ॲपवर व्हिडीओ अपलोड करा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. तेव्हा युट्युबर औदुंबर गवारे यांनी झीरो बॅलन्स असलेला अकाउंट नंबर दिला. तेव्हा त्यांचे पहिले पेमेंट 2500 रुपये जमा झाले. मग जसजसे व्हिडीओ अपलोड केले तसतसे पेमेंट ही वाढत गेले. मग औदुंबर गवारे यांनी यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली.
औदुंबर गवारे हे आधी स्वतः व्हिडीओ बनवत होते. मग त्यांच्या पत्नीनेही सोबत व्हिडीओ बनविण्यास सुरूवात केली. आता औदुंबर गवारे त्यांच्या कुटुंबीयांसोबत व्हिडीओ बनवितात. यू-ट्यूबवर त्यांचे 8 लाख फॉलोअर्स आहेत. ते कौटुंबिक, रुसवे-फुगवे आदी विनोदी व्हिडीओ बनवितात. या व्हिडीओच्या माध्यमातून ते कमाई करतात. या पैशातूनच त्यांनी 3 गुंठे जागा घेतली. त्यांची मुलगी परी हिला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे आहे. सर्वांपेक्षा वेगळा व्हिडीओ असला की तो व्हायरल होतोच, असा संदेश नविन इन्फ्लुएन्सर औदुंबर गवारे यांनी दिला आहे.