पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गोविंद बर्गे हे मानसिक तणावाखाली होते. एका कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध होते. या संबंधांच्या सुरुवातीला गोविंद यांनी पूजाला प्लॉट, शेतजमीन, महागडे दागिने, बुलेट आणि आयफोनसारख्या अनेक महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. मात्र, पूजाच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि ती पैशासाठी व मालमत्तेसाठी गोविंद यांच्यावर दबाव आणू लागली, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले.
advertisement
गोविंद बर्गे यांनी गेवराईत एक आलिशान बंगला बांधला होता, ज्यात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि वडील राहत होते. एकदा पूजा गायकवाड दोन दिवस या बंगल्यात मुक्कामी आली होती. यानंतर तिला हा बंगला इतका आवडला की तिने हा बंगला तिच्या नावावर करण्यासाठी गोविंद यांच्याकडे हट्ट धरला. गोविंद यांनी तिला दुसरा बंगला देण्याचे आश्वासन दिले, पण पूजा काही ऐकण्यास तयार नव्हती. अखेर पूजाने गोविंदशी बोलणे बंद केले. यामुळे गोविंद आणखी तणावाखाली आले.
पूजाने पुन्हा बोलावं म्हणून गोविंद बर्गे यांनी सर्व प्रयत्न केले. ते पूजा काम करत असलेल्या कला केंद्रात गेले, तिच्या मैत्रिणीला संपर्क केला, पण कोणताही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी थेट पूजाच्या घरी जाऊन तिच्या आईला भेटण्याचा निर्णय घेतला. 'तिला समजावा, ती माझ्याशी बोलत नाहीये,' असे त्यांनी पूजाच्या आईला विनवले. मात्र, पूजाच्या आईकडूनही त्यांना कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. निराश झालेल्या गोविंद यांनी पूजाच्या घराबाहेरच स्वतःच्या चारचाकीमध्ये बसून स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.