पूजा गायकवाड रात्रभर कला केंद्रात
गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाडच्या घरासमोर गोळी झाडून आत्महत्या केली, तेव्हा पूजा गायकवाड सासुरे गावात नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती रात्रभर पारगाव येथील कला केंद्रात होती. गोविंद बर्गे हे गेवराईहून पूजाचा शोध घेत बार्शी तालुक्यातील वैरागजवळ आले होते, कारण तिचा फोन लागत नव्हता. इथे आल्यावर त्यांनी पूजाला अनेकदा फोन केले होते. त्यामुळे, आता पोलीस गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील कॉल रेकॉर्डवरून तपासाची पुढील दिशा ठरवत आहेत.
advertisement
तीन दिवसांची पोलीस कोठडी
गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येशी संबंधित प्रकरणात पूजा गायकवाडला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत, जेणेकरून आत्महत्येमागचे नेमकं कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होऊ शकेल. पूजाची पोलीस कोठडी या तपासामध्ये एक महत्त्वाचा दुवा ठरू शकते, अशी शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घातपाताचा संशय
दरम्यान, बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) यांच्या मृत्यूप्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केल्याने याप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. गोविंदच्या कारचा दरवाजा लॉक होता. त्याच्या गाडीची बॅटरी उतरली होती. हे कसं शक्य आहे? असा सवाल त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.