सोलापूर : बहुतांश वेळा दारू, सिगारेट, गुटखा आणि तंबाखू या पदार्थांच्या सेवनामुळे माणसाचे सुखी आणि निरोगी आयुष्य उध्वस्त होते. हल्ली अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाणही वाढते आहे. काही लोक आयुष्यात येणारे चढउतार आणि ताणतणाव यातून मोकळे होण्यासाठी तर दुसरीकडे श्रीमंतांमध्ये स्वतःची प्रतिमा उंचावलेली ठेवण्यासाठी व्यसन करताना दिसतात. मात्र, व्यसनाची हीच गोडी आयुष्य पोखरते, असे आरोग्यतज्ज्ञ वारंवार सांगतात. पण तरीही बहुतांश जण त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या घातक व्यसनांच्या मायाजाळात अडकलेल्या तरुणाईला समुपदेशनाद्वारे बाहेर काढण्याचे काम सोलापुरातील एक युवक करत आहे. रामचंद्र वाघमारे असे या तरुणाचे नाव आहे.
advertisement
लहानपणापासूनच व्यसनाची झळा सोसलेला रामचंद्र हे मुळचे मोहोळ तालुक्यामधील अनगर या गावचे रहिवासी आहेत. कुटुंबामध्ये आई वडील, चार बहिणी, रामचंद्र आणि त्यांचा मोठा भाऊ आहेत. त्यांच्या वडिलांनी बहिणीच्या लग्नासाठी कर्ज काढले. कर्जाचा वाढता डोंगर पाहून वडिलांना ताणतणावामुळे तंबाखू, सिगारेट, दारूचे व्यसन जडले. त्यामुळे घरात कायमचे तणावाचे वातावरण असायचे. वाढत्या कर्जापाई आणि घरातल्या त्रासाला कंटाळून मोठा भाऊ मुंबईला कामानिमित्त निघून गेला.
घरातील तणावाचे वातावरण, कर्जबाजारीपणा यातून रामचंद्र यांची मानसिक कुचंबणा होत होती. वडिलांचं व्यसन कसं कमी होईल? यावर ते विचार करायचे. कौटुंबिक अनुभावातून पदवीपर्यंतच शिक्षण त्यांनी गावामध्येच पूर्ण केले. समाजकार्याचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी गाव सोडले. समाजकार्याचे शिक्षण घेताना समाजातील व्यसनमुक्तीबाबत त्यांनी अभ्यास केला. मित्रांमध्ये विविध विषयावर चर्चा करीत असताना समाजातील युवकांच्या विविध अडचणी समोर आल्या. त्यातून सामाजिक संस्था सुरू करून याविषयी काम करण्याचा निर्णय रामचंद्र आणि त्याच्या मित्रांनी केला.
सारथी युथ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तंबाखू व्यसनमुक्ती विषयावर 2013 मध्ये काम सुरू केले. तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पांतर्गत शाळा, महाविद्यालये आणि समुदाय स्तरावर तंबाखू व्यसनमुक्ती विषयी जनजागृती कार्यक्रम राबविले. यामध्ये किशोर आणि युवा अवस्थेतील युवकांना तंबाखू दुष्परिणामांविषयी माहिती दिली. सारथीच्या माध्यमातून मागील 12 वर्षांमध्ये 30 हजारहून अधिक युवकांना समुपदेशनाचा लाभ मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांचे हे कार्य समाजासाठी खरोखरंच प्रेरणादायी आहे.