सोलापूरात नवविवाहितेचा खून, थोरल्या जावेनेच काढला काटा, कोर्टाने दिली मोठी शिक्षा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील अंजनगाव येथे संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या नवविवाहितेच्या खून प्रकरणी बार्शी न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील अंजनगाव येथे संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या नवविवाहितेच्या खून प्रकरणी बार्शी न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. स्वतःच्या धाकट्या जावेचा गळा दाबून खून करणाऱ्या आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळणाऱ्या थोरल्या जावेला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गीता पाडुळे असं शिक्षा झालेल्या महिलेचं नाव आहे. तर उज्वला पाडुळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.
नेमकी घटना काय आहे?
मृत उज्ज्वला पाडुळे हिचा विवाह २९ नोव्हेंबर २०२२ रोजी किरण पाडुळे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी उज्वला माहेरी जाताना तिने आपले मंगळसूत्र आणि सोन्याची रिंग घरातील कपाटात ठेवली होती. मात्र, माहेरून परत आल्यावर तिला तिचे दागिने कपाटात आढळून आले नाहीत. यावरून उज्ज्वला आणि तिची थोरली जाऊ गीता पाडुळे यांच्यात जोरदार वादावादी झाली. आपल्यावर चोरीचा आळ घेतल्याचा राग गीताच्या मनात होता.
advertisement
खुनाचा थरार आणि बनाव
२ फेब्रुवारी २०२३ रोजी याच रागातून गीता हिने उज्ज्वलाचा घरातच गळा आवळून खून केला. गुन्हा लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिने उज्ज्वलाचा मृतदेह घरातच पेटवून दिला. एवढ्यावरच न थांबता, हे कृत्य अज्ञात व्यक्तीने केल्याचा बनाव रचण्यासाठी गीताने स्वतःच्या अंगावर देखील चाकूने वार करून घेतले. पण पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता गीता पाडुळेचं बिंग फुटलं.
advertisement
पोलिसांचा तपास आणि न्यायालयाचा निकाल
माढा पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास केला. तपासादरम्यान गीताने रचलेला बनाव उघड झाला. पोलिसांनी याप्रकरणी भक्कम पुरावे गोळा करून बार्शी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून, न्यायालयाने गीता पाडुळे हिला जन्मठेप आणि दंड सुनावला.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 10:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूरात नवविवाहितेचा खून, थोरल्या जावेनेच काढला काटा, कोर्टाने दिली मोठी शिक्षा








