सोलापूर शहरात असलेल्या होटगी रोडवरील सोलापूर विमानतळावरून आजपासून विमानसेवा सुरू झाली आहे. सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर अशीही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर ते गोवा विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली असून आठवड्याच्या चार दिवशी म्हणजेच सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी Fly 91 कंपनीकडून ही विमानसेवा दिली जाणार आहे.
advertisement
गोवा येथून सोमवार आणि शुक्रवार सकाळी 7:20 वाजता सोलापूरसाठी विमान उड्डाण घेऊन सकाळी 8:30 वाजता सोलापूर विमानतळावर लँड होईल. सकाळी सोलापुरातून 08:50 वाजता सोलापूरहून विमान गोव्यासाठी उड्डाण घेऊन 10:15 वाजता गोवा विमानतळावर उतरणार आहे. तर शनिवारी आणि रविवारी गोव्यातून विमान सकाळी 04:05 वाजता उड्डाण घेणार आहे आणि सोलापूरला 5:10 वाजता उतरणार आहे. तर सोलापुरातून सायंकाळी 05:35 वाजता गोव्यासाठी विमान उड्डाण घेणार आहे आणि गोव्याला 6:50 वाजता उतरणार आहे.
सोलापूर ते गोवामधील अंतर जवळपास 410 किलोमीटरचे आहे. हा प्रवास महामार्गाने केल्यास 8 ते 9 तासाचा कालावधी लागतो. आता विमानसेवा सुरू झाल्याने काही तासांतच सोलापूर ते गोवा प्रवास करणे शक्य झाले आहे. सोलापूर ते गोवा विमानाने प्रवास करण्यासाठी FLY 91 या विमानाचे तिकीट 3281 रुपये आहे. तर पुढील काळात लवकरच सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैदराबाद, सोलापूर ते मुंबई, आणि सोलापूर ते बेंगळुरू विमान सेवा देखील सुरू होण्याची देखील अपेक्षा आहे. यावेळी प्रशासनाकडून विमानसेवेच्या घटनेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. गोव्यावरून सोलापूरला आलेल्या विमानावर वॉटर कॅननद्वारे पाणी मारून सलामी देऊन विमानाचे स्वागत करण्यात आले.