सोलापूर : उदरनिर्वाहासाठी सोलापुरात महिला विडी वळण्याचा काम करतात. मात्र, या विडी तयार करताना तंबाखूचा भपका नाकातोंडात जाऊन त्यांना टीबी, कॅन्सर, दमा, त्वचारोग, फुप्फुस, छातीचे विकार अशा गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. या शिवाय कायम एकाच जागेवर बसून काम केल्यामुळे कंबरदुखी, पाठदुखी अशा आजारांचा त्यांच्या आरोग्यावर खूप परिणाम होत होता. म्हणुन एका तरुणाचे निर्णयाने विडी वळणारे हात आता शिलाईकडे वळले आहेत.
advertisement
रोहन पुल्ली असे या तरुणाचे नाव आहे. त्याने ज्ञान प्रबोधिनीतर्फे विडी वळणाऱ्या महिलांना पिशवी निर्मितीचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले आहे. याचबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.
रोहन पुल्ली या तरुणाने सोलापूर शहरातील अशोक चौक येथे हा प्रकल्प सुरू केला आहे. आधी महिलांना कपडी पिशवी शिवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. पिशवी निर्मितीचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले जात आहे. विड्या वळणाऱ्या 35 महिला आज आपला पारंपरिक व्यवसाय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या विडी वळण्याचे काम सोडून शिलाई मशीनकडे वळल्या आहेत.
सोलापूर शहरात अनेक ठिकाणी महिला विडी वळताना दिसतात. हे काम जरी उदरनिर्वाहासाठी असले तरी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मात्र फार कठीण असते. त्यामुळे या महिलांसाठी काही तरी केले पाहिजे या विचाराने या कामाची सुरुवात झाली. या पिशवी बनविण्याच्या व्यवसायातून महिलांना 5 ते 6 हजार रुपये महिन्याअखेर मिळत आहे. गेल्या वर्षभरामध्ये 14 लाख पिशव्यांची निर्मिती केली आहे. या पिशवी निर्मितीच्या व्यवसायातून वर्षाला 90 लाख उलाढाल होत आहे. रोहन पुल्ली या तरुणाच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे.