काय आहे प्रकरण?
लोहारा शहरातील कानेगाव रस्त्यालगत उमाबाई सुरेश रणशूर (वय ५५) या आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्यांचे कुटुंब पती सुरेश, मुलगा सौदागर, सून पूजा आणि नातवंडे असे होते. गेल्या काही दिवसांपासून उमाबाईंचा मुलगा सौदागर आणि सून पूजा यांच्यासोबत काही ना काही कारणावरून वाद सुरू होता. सोमवारी (२५ ऑगस्ट) दुपारीही त्यांच्यात जोरदार भांडण झाले. याच भांडणादरम्यान, सौदागर आणि पूजा यांनी उमाबाई यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
आत्महत्येचा बनाव आणि संशय
आईचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच, दोघांनी घाबरून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उमाबाई यांच्या गळ्याभोवती साडी गुंडाळून 'आईने गळफास घेऊन आत्महत्या केली', असा आरडाओरड सुरू केला. त्यांनी उमाबाईंच्या दुसऱ्या मुलांना, महेश आणि परमेश्वर यांनाही फोन करून हीच माहिती दिली. लोहारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मंगळवारी दुपारी उमाबाईंवर अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र, आईचा संशयास्पद मृत्यू आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसल्यामुळे महेश यांना संशय आला. त्यांनी लागलीच लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी केलेल्या तपासात आणि शवविच्छेदनाच्या अहवालात उमाबाईंना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सौदागर आणि पूजा यांना अटक केली.
आधीही केली होती मारहाण
पोलिसांच्या चौकशीत दीड वर्षांपूर्वीही सौदागर आणि पूजा यांनी उमाबाईंना मारहाण केली असल्याचे समोर आले. त्यावेळीही कुटुंबातील सदस्यांनी त्यांना समजावले होते, पण त्यांच्या स्वभावात काहीच बदल झाला नाही. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत उमाबाईंचे पती सुरेश हे व्यसनाधीन असल्यामुळे त्यांना या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.