नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एका टेम्पोने उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात ६ ते ७ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील चांदवड तालुक्यातील सोग्रस फाट्यावर ही घटना घडली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर एका मिनी टेम्पोनं शाळकरी विद्यार्थ्यांना धडक दिली. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यामुळे हे विद्यार्थी घरी निघाले होते. पण, अचानक पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने विद्यार्थ्यांना चिरडलं. टेम्पो हा भरधाव वेगात होता. त्यामुळे चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं आणि विद्यार्थ्यांना चिरडून पुढे थांबला. या अपघातात २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. रोहित साहेबराव पवार आणि अक्षय रमेश महाले अशी मृत्यांची नावं आहे. तर या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले आहे. स्थानिकांनी धाव घेऊन विद्यार्थ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.
advertisement
शिवसेनेचे नेते दादा भुसे पोहोचले रुग्णालयात
सदरील टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या अपघातात समृद्धी पवार, आदित्य गांगुर्डे आणि दीपक केदारे हे विद्यार्थी जखमी झाली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाला तेव्हा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे नाशिक येथून मालेगावकडे जात होते, त्यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करत जखमीना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. शिवाय त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.
स्थानिकांनी केला रास्ता रोको
शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी 4 तास मुंबई -आग्रा महामार्ग रोखून धरला अखेर ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील आणि इतर अधिकारी घटनास्थळी येऊन त्यांनी सर्वांची समजूत काढल्यावर वाहतूक सुरू झाली. पोलिसांनी टेम्पोचालकाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.