रमाबाई आंबेडकर नगरातील पुतळा विटंबनेप्रमाणेच परभणीमध्ये जे काही घडले, ते आधीच ठरवलेले होते. लोक रस्त्यावर येणार हे माहिती असूनही पोलिसांनी शांतता राखण्याऐवजी वस्त्यांमध्ये घुसून निर्दोष नागरिकांना बेदम मारहाण केली, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.
सुजात आंबेडकर यांचे पोलिसांवर गंभीर आरोप
फक्त पोलिसच नव्हे, तर बाहेरून आणलेले गुंड जे मंत्र्यांचे किंवा गावगुंडांचे होते त्यांनीही भीमसैनिकांवर हल्ला केला. हे सगळं व्हिडिओंमधून स्पष्ट दिसत आहे. बाबासाहेबांची सही, अशोकचक्र, जय भीम आणि संविधान लिहिलेल्या गाड्याही पोलिसांनी तोडल्या, हे पाहून संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे. एका गर्भवती महिलेला रस्त्यावर लोळवत पोलिसांनी मारहाण केली आणि महिला पोलिसही तिथे उपस्थित नव्हत्या, असे गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी पोलीस आणि राज्य सत्तेवर केले.
advertisement
...तर समाज त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही
सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढलेला परभणी ते मुंबई लाँग मार्च काही दलालांच्या अर्धवट नेतृत्वामुळे अपयशी ठरला. जर कुणी शहीदाच्या बलिदानावर नेतेगिरी करत असेल, तर समाज त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शांतता मार्च शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला असून, राज्यातील संविधान प्रेमी समाजात पोलिस अत्याचारांविरोधात तीव्र संताप आहे. न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा अधिक तीव्र करेल, असा इशारा सुजात यांनी दिला.