शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या आठवणीला उजाळा देत भाजपवर टीका केली होती. आता भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. घोसाळकर या वॉर्ड क्रमांक २ मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांच्या प्रचार कार्यालयाला आणि शिवसेना शाखेला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर कुटुंबातील फुटीवर भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, "आज अभिषेक असता तर घोसाळकरांचे घर फोडण्याची भाजपची हिंमत झाली नसती. मला विनोद घोसाळकरांचा अभिमान आहे. मी येथे तेजस्वी घोसाळकरांच्या विरोधात नाही, तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलो आहे. भाजपने घोसाळकरांच्या घरात भांडण लावून फोडाफोडी केली आहे.
advertisement
तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार...
एका वृत्तवाहिनीशी बोलताना तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले की, "मी आणि अभिषेकने मिळून प्रत्येक निर्णय घेतला होता. अभिषेक असता तर त्यानेही माझ्यासोबतच निर्णय घेतले असते. अभिषेक आजही माझ्यासोबतच आहेत, अशी माझी भावना आहे. उद्धव ठाकरे अभिषेकचे नाव घेऊन उगाचच प्रचार करत आहेत. तो माझा नवरा आहे, मी कोणताही निर्णय घेऊ शकते. त्यात इतरांनी ढवळाढवळ करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले. निष्ठावंत वगैरे म्हणणे आता चुकीचे आहे. राजकीय फायद्यासाठी अभिषेकच्या नावाचा वापर करणे थांबवावे असेही तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक १ मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर हे देखील नगरसेवक होते. अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह सुरू असताना फेब्रुवारी २०२४ हत्या झाली होती. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. त्यांच्या जागी काही महिन्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांची संचालक म्हणून वर्णी लागली. त्यानंतर, मागील महिन्यातच तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला.
