ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात बंडखोरीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्याचा पहिला फटका थेट भारतीय जनता पक्षाला बसला आहे. भाजपाच्या चार माजी नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त करत भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून, तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
भाजपाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव, केवलादेवी यादव, महेंद्र सोडारी आणि वर्षा पाटील यांनी उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराजी व्यक्त करत भाजपाशी संबंध तोडले. आगामी निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत या चौघांनी एकत्रितपणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
advertisement
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करताच या चारही माजी नगरसेवकांना एबी फॉर्म देण्यात आला. यामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपवर गंभीर आरोप...
पक्षांतरानंतर या माजी नगरसेवकांनी भाजपावर गंभीर आरोपही केले आहेत. काही भाजप आमदारांनी उमेदवारी पैसे घेऊन विकली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे भाजपाच्या अंतर्गत राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणामुळे भाजप नेतृत्वाची चांगलीच अडचण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
ठाण्यातील ही बंडखोरी केवळ सुरुवात असल्याचे बोलले जात असून, आगामी काळात आणखी काही असंतुष्ट नेते भाजपाला धक्का देऊ शकतात, अशी चर्चा आहे.
