राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये युती आघाडीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ठाण्यात शिवसेना पक्षातील इच्छुकांची संख्या पाहता भाजप आणि राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे. त्यामुळे जागा वाटपाचे गणित जुळवणे अवघड होऊन बसले आहे.
५०-५० टक्के जागांचं वाटप व्हावं, भाजपची मागणी, एकनाथ शिंदे काय करणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे मंडळ अध्यक्षांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये पन्नास टक्के जागा मिळाव्या याकरिता निवेदन देऊन ५०-५० टक्के जागांचं वाटप व्हावं अशी मागणी केली आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये ५० टक्के जागांवर आम्हाला उमेदवारी देण्यात यावी तसेच कळव्यात देखील भाजपचे १६ नगरसेवक आहेत. प्रत्येक प्रभागांमध्ये दोन जागा आम्हाला देण्यात याव्यात अशी मागणी कळवा मंडळ अध्यक्ष तेजस चंद्रमोरे यांनी केली.
advertisement
युती होणार की फिस्कटणार?
नुकतीच ठाण्यातील भाजप कार्यालयामध्ये शिवसेना आणि भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून विद्यमान नगरसेवक वगळून उर्वरित २३ जागांवर चर्चा करावी, असे ठरले होते. मात्र आता मंडळ अध्यक्षांच्या नाराजीमुळे येणाऱ्या महापालिकेत महायुतीमधील शिवसेना आणि भाजप पक्षाची ठाण्यात युती होते की फिस्कटते याकडे लक्ष आहे.
महायुतीच्या चर्चा सुरू असताना काल ठाण्यात भाजपा शिवसेनेची युती म्हणून पहिली बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला निमंत्रण न दिल्याने ते कमालीचे आक्रमक झाले. काहीही झाले तरी भाजप सोबत लढणार नाही, अशी भूमिका घेत आम्ही सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आम्ही युतीत लढणार नाही, लढू तर स्वतंत्र!
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ठाण्यातील मुख्य कार्यालयात इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटायला सुरुवात केली असून जवळपास ४०० पेक्षा जास्त जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून लढण्याची इच्छा व्यक्त केलीये. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी विरोधी पक्ष नेते नजीब मुल्ला यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.
