शिक्षण विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये 13 प्राथमिक शाळा बंद झाल्या. कोरोनाकाळानंतर बंद झालेल्या 13 शाळांपैकी अनेक शाळा ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात होत्या. टेंभी नाका परिसरामध्ये 7 आणि 17 क्रमांकाच्या दोन शाळा आहेत. या सर्वांत जुन्या मराठी शाळांपैकी आहेत. याठिकाणी आता इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरवले जात आहे. गेल्या पाच वर्षांत नवीन एकही शाळा वाढलेली नाही.
advertisement
महानगपालिकेच्या शिक्षण विभागाकडे नोंद असलेल्या आकडेवारीनुसार, 2018 ते 2019 या शैक्षणिक वर्षात ठाणे शहरात 121 प्राथमिक शाळा होत्या. मात्र, 2024 ते 2015 या शैक्षणिक वर्षात ही संख्या 103 वर घसरली आहे. माध्यमिक शाळांची संख्या 22वर स्थिर आहे. मराठी शाळांचे झपाट्याने कमी होणारे प्रमाण चिंताजनक आहे.
सध्याची स्थिती बघता भविष्यात मराठी शाळांची संख्या सातत्याने कमी होण्याची शक्यता आहे. सध्या बहुतांशी पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दाखल करत आहेत. त्यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. याशिवाय पालकांच्या स्थलांतरामुळे देखील मराठी शाळा बंद करण्याची वेळ येत आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी झाल्याचे चित्र आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा चालवणे आर्थिक दृष्टिकोनातून परवडत नाही.
मराठी शाळांची झालेली दुर्दशा बघता अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी ठोस धोरणांची गरज व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी योजना आखाव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. मराठी शाळांच्या सद्यस्थितीबाबत शिक्षण विभाग प्रतिक्रिया देण्यास अद्यार पुढे आलेला नाही.