प्रदीप भानगे, प्रतिनिधी कल्याण: ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या शहाडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या पुतण्यावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या हल्ल्यात पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काका आपल्या पुतण्यावर वार करताना दिसत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड कोळीवाडा परिसरात शनिवारी संध्याकाळी घडली. जमिनीच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती आहे. या हाणामारीत काकाने आपल्या पुतण्याला लोखंडी टोकदार हत्याराने मारहाण केली. या घटनेत एकूण तीन जण जखमी झाले आहेत. यातील एकजण गंभीर आहे.
विनोद दत्तात्रेय कोट असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. विनोद हा आपल्या आई-वडिलांसोबत शहाड परिसरात राहतो. त्याचा आपले नातेवाईक काकांसोबत गेल्या काही काळापासून वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरू आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्या घराच्या टेरेसवर वडील दत्तात्रेय कोट हे साफसफाई करत होते. यावरून काकांना गैरसमज झाला. काकांनी टेरेसवर पाण्याची टाकी बसवली जात असल्याचा आरोप करत वाद सुरू केला. वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले.
काका विष्णू कोट, काकू लीलाबाई कोट आणि त्यांचा मुलगा कुणाल कोट यांनी विनोद आणि त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली सुरू केली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या विनोदला लोखंडी टोकदार हत्याराने त्याच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ वार केले. या नंतर दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. ज्यात तीन जण किरकोळ जखमी तर एक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी दोन्ही कुटुंबाविरोधात परस्पर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.