ठाणे : गरिबीवर मात करुन जेव्हा एखादं यश मिळतं ते यश त्या व्यक्तीसाठी प्रचंड आनंद देणारं असतं. दिव्यातील सचिन पाटील यांनी सुद्धा असेच लहानपणी प्रचंड गरिबीचे दिवस पाहिले, अनुभवले. वडील इलेक्ट्रिशियन असल्यामुळे त्यांच्याच हातावर पोट होते. कॉलेजमध्ये असतानासुद्धा त्यांनी प्रचंड मेहनत केली.
मिळेल ते, जमेल ते काम करत त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांच्या या सर्व परिश्रमाचं फळ त्यांना मिळालं. गेल्या 10 वर्षांत दिव्यात त्यांचा स्वतःचा श्री गणेशा क्लासेस नावाचा कोचिंग क्लास प्रसिद्ध झाला आहे. या क्लासचं वैशिष्ट्य म्हणजे, परिस्थितीची जाणीव असल्यामुळे दरवर्षी 2 ते 3 विद्यार्थ्यांना सचिन पाटील हे स्वतः मोफत शिक्षण देतात. त्यांच्याकडून कोणतीही फी आकारत नाहीत.
advertisement
सचिन हे मूळचे घाटकोपरचे आहेत. त्यांचं बालपण तिथेच गेलं. वडाळ्यातील एसआयडब्ल्यूएस या कॉलेजमध्ये त्यांचा बीकॉम झालं. सुरुवातीला सचिन यांचा घाटकोपर येथे स्वतःचा आठ वर्ष क्लास होता. परंतु पार्टनरशिपच्या काही कारणाने त्यांनी तो क्लास बंद केला. यानंतर दिव्यात स्वतःचा 8 ते आता 10 वर्षे क्लास सांभाळत आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांना अनेक लोकांनी तुम्हाला हे जमणार नाही, असं बोलून त्यांचं खच्चीकरण केलं. मात्र, त्यांनी कधी हार मानली नाही आणि कष्ट करून त्या सर्वांना उत्तर दिलं.
महाबळेश्वर, पाचगणीचे पावसाळ्यातील नयनरम्य दृश्य, पर्यटकांची मोठी गर्दी, मोहित करणारे फोटो समोर!
शिक्षक सचिन पाटील काय म्हणाले -
'मला परिस्थितीची जाणीव आहे आणि याच कारणाने मी दरवर्षी 3 ते 4 मुलांना मोफत शिक्षण देतो. या संपूर्ण प्रवासात मला अनेकांनी तुला हे जमणार नाही असं सांगितलं. परंतु मी हार मानली नाही. माझे आज अनेक यशस्वी विद्यार्थी मला जेव्हा भेटायला येतात तेव्हा प्रचंड आनंद होतो आणि संपूर्ण प्रवासात खूप यश मिळवल्याचं समाधान देखील वाटतं,' या शब्दात श्री गणेशा क्लासेसचे शिक्षक सचिन पाटील यांनी आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्यांना आयुष्यात काही साध्य करायचंय, पण परिस्थितीमुळे शक्य होत नाही, अशा सर्वांसाठी सचिन पाटील यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे.





