तपोवन वृक्षतोड प्रकरण नेमके काय आहे?
तपोवन हा नाशिकमधील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर मानला जातो. गोदावरी नदीच्या काठालगत असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर जुनाट, दाट आणि जैवविविधतेने समृद्ध अशी झाडे आहेत.
मात्र, महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात रस्ते रुंदीकरण, विकासकामे आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार शेकडो झाडे तोडण्याची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
advertisement
मात्र, या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेऊन पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही स्वयंसेवी संस्थांनी याला तीव्र विरोध दर्शवला.
हरित लवादाचे स्पष्ट निर्देश
या प्रकरणाची गंभीर दखल घेत हरित लवादाने महापालिकेला कठोर निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणीपर्यंत तपोवन परिसरात कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, लवादाच्या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, हे केवळ तात्पुरते दिलासादायक पाऊल असून, पुढील सुनावणीत काय निर्णय होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
