खासदार वायकर आणि आयुक्त गगराणी यांच्यात 10 सप्टेंबर रोजी महापालिका मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत एकूण 30 प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली आणि काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये वर्सोवा आणि यारी रोड येथील मार्केटचे पुनर्विकास करण्यासाठी लवकरच निविदा काढण्याचे आश्वासन दिले गेले. टोपीवाला मार्केटचे पुनर्विकास कामही सुरु असून, जून 2026 पर्यंत दुकानदारांना त्यांच्या दुकानांचा ताबा मिळेल. तसेच, दिंडोशीतील कुरार पॅटर्नचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर आणि ओयो हॉटेल्सवर कारवाई केली जाणार आहे.
advertisement
आरोग्य क्षेत्रातही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालय आता कूपर रुग्णालयाशी संलग्न झाले असून येथे 12 अतिदक्षता बेड कार्यान्वित केले गेले आहेत. लवकरच आणखी २२ बेडसाठी निविदा काढल्या जाणार आहेत.
पावसाळ्यातील पाण्याच्या तुंबण्यापासून सुटका करण्यासाठी गोरेगाव (पूर्व) ऑबेरॉय मॉल परिसरातील नाल्यांची क्षमता वाढवण्याचे कामही होणार आहे.
त्याचबरोबर, मढमार्वे ब्रिज, वर्सोवा खाडीतील एसटीपी प्रकल्प, सीबीएससी वर्ग सुरू करणे, वेरावलीतील रिझर्व्हॉयर टाकी, तसेच जोगेश्वरी (पूर्व) पेप्सी गोडाऊन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी यासंबंधीही निर्णय घेण्यात आले.
या सर्व निर्णयांमुळे जोगेश्वरी आणि परिसरातील रहिवासी वाहतूक, पाणी तुंबणे, आरोग्य सुविधा आणि सांस्कृतिक उभारणी या सर्व बाबतीत सुधारणा अनुभवणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे शहरातील जीवनमान सुधारेल आणि नागरिकांना अनेक सोयी मिळतील.