सासऱ्याच्या निवडणुकीच्या खर्चासाठी माहेरहून तब्बल दहा लाख रुपये आणावेत, या सततच्या तगाद्यामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण कुरुंदवाड शहरात खळबळ उडाली आहे. कौसर गरगरे (वय २७) हिने २० नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर उघड झालेल्या घटनाक्रमानं दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढला आहे.
advertisement
कौसरच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच या आत्महत्येमागे संशय व्यक्त केला होता. मृतदेह स्वीकारण्यास त्यांनी नकार देत पोलिसांकडून सखोल चौकशीची मागणी केली. त्यानंतर कौसरचा भाऊ अलताफ आवटी (रा. जयसिंगपूर) यांनी कुरुंदवाड पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, कौसरवर तिचे पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय ३१), सासू मुमताज गरगरे, सासरे राजमहंमद गरगरे आणि जाऊ समिना इलहान गरगरे (वय २८) यांनी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कौसरवर तिच्या पतीच्या व्यवसायासाठी तसेच सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी दहा लाख रुपये आणण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला. पैशांसाठी चाललेल्या या तगाद्यातूनच तिच्यावर अत्याचार वाढले आणि या सततच्या छळाला कंटाळून कौसरने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकरणातील दोन आरोपी कौसरचा पती इंजमाम गरगरे आणि जाऊ समिना गरगरे यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सासू आणि सासऱ्याची अद्याप अटक झालेली नाही. पोलीस त्यांची भूमिका आणि सहभाग तपासत आहेत.
कुरुंदवाडमध्ये या घटनेमुळे संतापाची भावना पसरली असून महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला आहे. पोलीस पुढील तपास वेगाने सुरू असून कौसरला न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
