19 फेब्रुवारीला राजकोटच्या पायल हॉस्पिटलमध्ये महिलांच्या चेकअपचे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. गुजरात पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करताना महाराष्ट्रातून दोन आरोपींना अटक केली. या दोघांच्या चौकशीनंतर पोलिसांनी प्रयागराजमधून युट्युबर चंद्रप्रकाश फुलचंदला अटक केली. चंद्रप्रकाशने त्याच्या चॅनलवर 55 ते 60 व्हिडिओ अपलोड केले होते. याप्रकरणी लातूरमधून प्रज्वल अशोक तेली आणि सांगलीमधून प्रज राजेंद्र पाटील यांना अटक केली.
advertisement
अहमदाबादच्या सायबर क्राईम डीसीपी लवीना सिन्हा यांनी सांगितलं की, तपासात तिघांनी महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ दुसऱ्या चॅनलना विकले. चंद्रप्रकाश फुलचंद स्वत: व्हिडिओ बनवायचा. हे व्हिडिओ तो स्वत:च्या चॅनलवर अपलोड करायचा आणि ऑनलाईन विकायचा. आरोपीच्या टेलिग्राम चॅनलवर 100 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत.
हे आरोपी महागड्या रेटने व्हिडिओ विकायचे. तसंच या आरोपींनी देशातल्या 60-70 हॉस्पिटलचे सीसीटीव्ही हॅक केल्याचा संशयही पोलिसांना आहे.
राजकोटच्या हॉस्पिटलचे सीसीटीव्ही हॅक
राजकोटच्या पायल हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फेब्रुवारी-मार्च 2024 साली हॅक झाले होते. हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून आलेल्या महिलांच्या चेकअपचे व्हिडिओ बनवले गेले आणि या व्हिडिओची विक्री सोशल मीडियावर केली गेली. हे सगळे व्हिडिओ युट्युब आणि टेलिग्रामवर विक्रीसाठी ठेवले गेले. याप्रकरणातही या गँगवरच पोलिसांना संशय आहे.
तपासामध्ये तीनही आरोपी युट्युब आणि टेलिग्राम चॅनलवर महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ विकत असल्याचं समोर आलं. या बदल्यात तिघंही मोठी रक्कम घेत होते. हे टेलिग्राम चॅनल सांगली आणि लातूरमधून चालवलं जात होतं. याप्रकरणी क्राईम ब्रांचने महाराष्ट्र आणि प्रयागराजमध्ये तपास केला.
रोमानिया-अटलांटामधून सीसीटीव्ही हॅक
अहमदाबादच्या क्राईम ब्रांचला या टोळीने वेगवेगळ्या हॉस्पिटलचे 60-70 सीसीटीव्ही हॅक केल्याचा संशय आहे. हे रॅकेट मागच्या वर्षभरापासून सुरू आहे, आता आरोपींना रिमांडमध्ये घेण्यात आलं आहे. याप्रकरणी प्रज्वल तेली मुख्य आरोपी आहे. या तीनही आरोपींनी 8 महिन्यात लाखो रुपये जमा केले. आरोपींनी व्हिडिओ 800 ते 2000 रुपयांना विकले. हॉस्पिटलचे आयपी ऍड्रेस रोमानिया आणि अटलांटामधून हॅक केले होते. प्रज्वलने रोमानिया आणि अटलांटाच्या हॅकर्सना संपर्क केला होता.
महाकुंभमध्ये महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी आतापर्यंत 3 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी सांगितलं आहे. याशिवाय महाकुंभबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी 55 ते 60 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.