एमएसआरडीसी कार्यालयात आज पार पडलेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महारेलचे अधिकारी तसेच नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान म्हातार्डी स्थानकाच्या एकात्मिक वाहतूक केंद्राच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
या आराखड्यानुसार, म्हातार्डी स्थानक हे केवळ बुलेट ट्रेनचे थांबेस्थान न राहता एक प्रमुख “मल्टी-मोडल ट्रान्झिट हब” म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे, मेट्रो, बस आणि महामार्ग या सर्व वाहतूक साधनांचा सुसंगत समन्वय साधला जाईल. महारेलने सादर केलेल्या संकल्पचित्रात म्हातार्डी स्टेशनला ठाणे आणि कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रो मार्गाशी जोडण्याच्या शक्यतांचा आढावा घेण्यात आला.
advertisement
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेची अंमलबजावणी हाय-स्पीड रेल्वे प्राधिकरणाच्या माध्यमातून शक्य तितक्या लवकर करण्याच्या सूचना दिल्या. या प्रस्तावावर प्राधिकरणाने सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाकडे पुढील मंजुरीसाठी पाठवण्यास सहमती दर्शवली आहे.
ही जोडणी प्रत्यक्षात आल्यास ठाणे, कोपर आणि तळोजा परिसरातील प्रवाशांना म्हातार्डी स्थानकावर सहज व जलद पोहोचता येणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा हा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचा ट्रान्सपोर्ट नोड म्हणून उदयास येईल.