मिळालेल्या माहितीनुसार, गाडेगाव येथील गणपतीचे सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आसना नदीत विसर्जन सुरू होते. नदीपात्र भरून असल्याने युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही.. बालाजी उबाळे, योगेश उबाळे आणि शैलेश उबाळे हे तिघेजण पाण्यात वाहून जात होते. यावेळी शैलेश उबाळे याला वाचवण्यात यश आलं. पण बालाजी उबाळे आणि योगेश उबाळे दोघेजण वाहून गेले. दोघांचे वय अवघे 18 ते 20 दरम्यान आहे. रात्री उशिरापार्यंत एस डी आर एफ च्या टीमने त्यांचा शोध घेतला पन ते सापडले नाहीत.
advertisement
शहापूरमध्ये ३ तरुण बुडाले
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळ असलेल्या शहापूर इथं गणपतीचं विसर्जन सुरू आहे. या दरम्यान आसनगावच्या मुंडेवाडी येथील तीन तरुण गणपती विसर्जन करताना वाहून गेले. आसनगाव रेल्वे ब्रीजजवळ असलेल्या मुंडेवाडी येथील भारंगी नदीमध्ये गणपती विसर्जन सोहळा सुरू आहे. या दरम्यान ही घटना घडली. आसनगाव येथील मुंडेवाडी या ठिकाणी राहणारे कुलदीप जाखेरे (वय 32), दत्तू लोटे (वय 30) आणि प्रतीक मुंढे (वय 23) हे तीन तरुण गणपती विसर्जनासाठी भारंगी नदी उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे तीन तरुण बुडाले. त्यांच्यासोबत असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरडा करून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काही कळायच्या आत तिन्ही तरुण वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक टीम शहापूर, शहापूर पोलीस प्रशासन आसनगाव ग्रामपंचायतचे प्रशासन तसंच आसनगावच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून सतत पडणारा पाऊस आणि दाटून आलेला अंधारामुळे शोधकार्य करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.