एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्राथमिक अंदाजानुसार, मुंबईतील ६० ते ८० जागांवर महायुतीच्या उमेदवारांना धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी कोणत्या जागेवर कोण लढणार, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. तुल्यबळ लढतीसाठी आणि त्यात विजय व्हावा यासाठी रविवारी २८ डिसेंबर रोजी रात्री दोघांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे.
advertisement
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे उभ्या राहिलेल्या ‘मराठी कार्ड’ला रोखण्यासाठी महायुतीने ‘जिंकण्याची शक्यता’ हा एकमेव निकष मानून जागावाटप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच फॉर्म्युल्यानुसार मुंबईतील बहुतांश जागांचे प्राथमिक वाटप करण्यात आले आहे.
> महायुतीमध्ये २०-३० जागांचा तिढा...
दरम्यान, सध्या मुंबईतील २० ते ३० जागांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागा वाटपाचा तिढा अजूनही सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, १२८ जागा आणि ७९ जागा लढवण्यावर एकमत झाले आहे. भाजपच्या वाट्याला येणाऱ्या १२८ जागा आणि शिवसेनेच्या ७९ जागा प्राथमिक स्वरूपात निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. आता उर्वरित जागांवर भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील चर्चा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
> ठाकरे बंधूंमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी रणनीती...
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महायुती मजबूत मानल्या जाणाऱ्या ६० ते ८० जागांवर परिणाम होऊ शकतो. या जागा कोणत्याही परिस्थितीत हातातून जाऊ नयेत, यासाठी योग्य ती रणनीती आखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गट काही जागांवर ठाम असला तरी त्या जागांवर विजयाची शक्यता कमी असल्याचा भाजपचा अंदाज असून, त्यासंबंधीची संपूर्ण आकडेवारी दोन्ही पक्षांनी परस्परांना सादर केली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा अंतिम तोडगा कसा निघणार, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीतच स्पष्ट ठरणार आहे. दरम्यान, युतीतच निवडणूक लढवली जाईल आणि जागा वाटपावर कोणताही वाद नाही, असा सूर दोन्ही गटांकडून व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे महायुतीच्या समन्वयात सहभागी असलेले राहुल शेवाळे यांनीही जागावाटपाचा प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आजच्या महायुतीच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
